अमर काणे, झी मीडिया, नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून नागपुरातल्या गोरेवाडा बचाव केंद्रात उपचाराकरता आणण्यात आलेला खली ( टी-50) या वाघाचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.ताडोबा बफर झोनमध्ये 8 मेला मोहर्ली आगझरी वनपरिक्षेत्रात तो वनकर्मचा-यांना जखमी अवस्थेत दिसला.त्यानंतर नागपुरात गोरेवाडा बचाव केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु होते. ताडोबात येणा-या पर्यटकांसाठी खली वाघा आकर्णाचं केंद्र होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत रुबाबदार असलेला खली वाघाचा आगझऱी वनपरिक्षेत्रात वावर होता. धष्टपुष्ट आणि भारदस्त शरिर आणि आकर्षक रुप यांमुळं टी-50 नावाच्या या वाघाला खली नावानं ओळखलं जात होतं. आगरझरी वनपरिक्षेत्रात त्याचा चांगलाच दरारा होता. त्यामुळं हा रुबाबदार वाघ पर्यंटकांचंही आकर्षण होता. 8 मे रोजी ताडोबा बफर झोमधील आगझरी येथे वनकर्मचा-यांना तो जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला दोन्ही पायान चालता येत नसल्यानं तसेच तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं 10 मेला गोरेवाडा बचाव केंद्रात पुढील उपचाराकरता आणण्यात आलं.



गेल्या दोन महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा आढळून आली नाही. त्याच्या पाठिचा कण्याला जबर मार लागलेला होता. त्यामुळं पक्षुवैद्यकिय पथक त्याच्यावर उपचार देत होते.  मात्र खलीला उठताही येत नव्हते.अखेर उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. खली साधारण 10 वर्षांचा होता.



दोन महिन्यापूर्वी त्याला एखाद्या वाहनाची धडक लागल्यानं त्याचा मणक्याला दुखापत झाली होती. त्याच्यातून तो सावरूच शकला नाही आणि दोन महिन्यांच्या उपचारात संघर्षानंतर त्याचा मृत्यू झाला.  दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकिय अधिकारी त्याची उत्तरिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला अग्नी देण्यात आला.