जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड
जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिक्षक आणि विद्यार्थी त्यााच उत्साह वाढवत होते, एका पायावर या विद्यार्थ्याने रायगड सर केला आणि एकच जल्लोष झाला
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : जिद्दी पुढे आकाशही ठेंगणं पडत असं म्हणतात. जिद्द, मेहनत आणि इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. पिंपरी-चिंचवडमधल्या (Pimpri-Chinchwad) ओमकार लकडे या विद्यार्थ्याने जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्या निकेतन शाळेत (Vidya Niketan School) सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या ओमकरने चक्क एका पायावर किल्ले रायगड (Kille Raigad) सर केलाय. ओमकारच्या सहासाचं सर्वत्र कौतुक होतंय. लहानपणी एका अपघातात ओमकारला एक पाय पूर्णतः गमवावा लागला. त्यामुळे त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. पण याचा त्याने कधीच बाऊ केला नाही.
आकाशची जिद्द पाहून पर्यटकही थक्क
विद्यानिकेतन शाळेची सहल रायगडावर आयोजित करण्यात आली होती. ओमकारलाही आपल्या शालेय मित्रांबरोबर रायगड सर करायचा होता. तशी इच्छाही त्याने शिक्षकांकडे बोलून दाखवली. पण शिक्षकांसमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराजा यांचा इतिहास वाचून प्रेरित झालेल्या ओमकारने रायगड चढण्याचा निर्धारच केला. त्यामुळे शिक्षकही त्याच्या पाठिशी उभे राहिले.
कुबड्यांच्या मदतीने रायगड केला सर
20 जानेवारीला शाळेची सहल रायगडावर निघाली. रायगडच्या पायथ्याशी आल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी गड सर करायला सुरुवात केली. जिद्दीला पेटलेला ओमकारही मागे हटला नाही. कुबड्यांच्या मदतीने त्याने अवघड चढणीसह सुमारे 1435 पायाऱ्या चढत गड सर केला. केवळ काठीचा आधार घेत एका पायाने गड चढणाऱ्या ओमकारला पाहून अनेक पर्यटकही थक्क झाले थबकले आणि त्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.
'जय भवानी जय शिवाजी'
ओंकार न थकता गडाच्या पायऱ्या चढत होता. त्याला उत्साह कमी होऊ नये यासाठी त्याच्याबरोबर असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी ' जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करत त्याला पाठिंबा दिला. बघता बघता ओमकारने रायगड सर केला आणि एकच जल्लोष झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या साथीने ओमकारने सव्वा दोन तासात रायगड लीलया सर केला. त्याच जोमाने न थकता तो गडावरुन खालीही उतरला. ओमकारची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.