आवडीच्या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मिळाला ‘स्वाधार’

स्वाधार योजनेची माहिती मिळताच भगवानने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याने या योजनेसाठी अर्ज सादर केला.
जयेश जागड, झी मीडिया, वाशिम: वाशिम तालुक्यातील तोंडगाव या मोठी शैक्षणिक परंपरा लाभलेल्या गावातील भगवान ढोले या तरुणालाही गावातील इतर युवकांप्रमाणे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी भगवानचे पालक मुलाच्या शिक्षणबाबात जागरुक होते. त्यांनी भगवानला सन २००९ मध्ये इयत्ता १२ वी उत्तीर्ण केल्यानंतर डी. एड.साठी ठाणे येथे पाठविले. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याचे डी. एड.चे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण घ्यायची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे आई-वडिलांना मदत करण्यासाठी भगवान पुन्हा गावाकडे आला.
गजानन छोटी-मोठी कामे करून आई-वडिलांना घर घालविण्यासाठी मदत करीत असताना एका स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आला. या संस्थेसोबत त्याने काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याने सन २०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
स्वयंसेवी संस्थेत काम करताना त्याला सामाजिक कार्यात आवड निर्माण झाली व पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय त्याने केला. त्याकरिता त्याने समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवीचे (एम.एस.डब्ल्यू.) शिक्षण घेण्याचे ठरविले. पण येथेही आर्थिक परिस्थिती पाठ सोडायला तयार नव्हती. त्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्याला दोन वर्ष एम.एस.डब्ल्यू.मध्ये प्रवेश घेणे शक्य झाले नाही. अखेर ठाम निश्चय करून त्याने २०१७-१८ मध्ये वाशिम येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात एम.एस.डब्ल्यू.च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला.
प्रवेश फी, शैक्षणिक साहित्य, भोजन व राहण्याचा खर्च याकरिता पैशाची जुळवाजुळव करीत त्याचे शिक्षण सुरु झाले खरे, पण ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैसे आणायचे कसे? हा प्रश्न होताच. वेळेवर पैसे जमवणे शक्य झाले नाही तर शिक्षण अर्ध्यातूनच सोडावे लागणार होते. पण याच दरम्यान वृत्तपत्रामधून भगवानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती समजली. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची ही योजना राज्य शासनाने आणली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती मिळताच भगवानने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याने या योजनेसाठी अर्ज सादर केला. या योजनेला पात्र ठरल्याने त्याला पहिल्याच वर्षी ३४ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले.
यामधून त्याचा प्रथम वर्षाची प्रवेश फी, निवास व भोजन खर्च आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविणे त्याला शक्य झाले. द्वितीय वर्षामाध्येही त्याला या योजनेचा लाभ मिळाला. पहिल्या टप्यात २३ हजार ५०० व दुसऱ्या टप्प्यात १६ हजार २०० असे ३९ हजार ७०० रुपये अर्थसहाय्य त्याला मिळाले. त्यामुळे द्वितीय वर्षाचे शिक्षण पूर्ण करताना त्याला कोणतीही आर्थिक अडचण आली नाही. एम.एस.डब्ल्यू. केल्यानंतर आता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला तो सज्ज झाला आहे.