स्वाती नाईक, झी मिडीया, नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्य असलेले विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्य चा राजीनामा दिला आहे. तसे पत्र महापौरांकडे आले आहे, मात्र हे पत्र मी दिले नाहीच, असा दावा विजय चौगुले यांनी केला आहे. यामुळे आता ते पत्र नेमकं कुणाचे या बाबत नवी चर्चा सुरु झाली असून यानिमित्ताने शिवसेनेतील फूट आता समोर आली आहे.


शहकाटशहाचे राजकारण सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ठाण्यात सत्ताधारी असलेली शिवसेना मुंबईच्या वेशीवरच्या म्हणजे नवी मुंबई महापालिकेत मात्र विरोधी बाकावर आहे. असं असलं तरी शिवसेनेतही गटबाजीने डोकं वर काढलय. विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि उपनेते विजय नहाटा यांचे दोन गट निर्माण झाले असून सध्या शहकाटशहाचे राजकारण सुरु आहे. आणि यावेळी हा प्रकार एका न पाठवलेल्या राजीनाम्यापर्यंत गेलाय.


काय घडला नेमका प्रकार?


तीन जानेवारीला महापौर कार्यालयात टपालाद्वारे विजय चौगुले यांचा स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा आला. महापौरांनी तो पुढील कार्यवाहीसाठी सचिव कार्यालयाकडे पाठवला. आणि 19 जानेवारीला महासभेत नवीन सदस्य निवड प्रकिया पार पडले असे घोषित झाले. पण यासंदर्भात आपण कुठलाही राजीनामा न दिल्याचे सांगत निवड प्रक्रिया थांबवावी असे खुद्द विजय चौगुले यांनी सचिवांना पत्र पाठवल्याने खळबळ माजलीय. यामुळे ते पत्र नेमकं कोणी पाठवलय याबाबत आता शिवसेनेतच खळबळ माजलीय. 


सेनेला फटका बसण्याची शक्यता


नवी मुंबईच्या शिवसेनेच्या राजकारणात अनेक घडामो़डी घडतायत. दोन महिन्यांपुर्वी नवी मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीत शिवसेनेने विजय चौगुले यांना उमेदवारी दिली होती. याबदल्यात स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा शब्द चौगुले यांनी पक्षाला दिला होता. मात्र ऐन वेळेला भाजपाने शिवसेनेला साथ न दिल्याने महापौर राष्ट्रवादीचा निवडून आला. दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी विजय चौगुले यांचे राजीनामा पत्र महापौरांकडे सादर करीत स्थायी समिती सदस्यपदाची निवडणूक लावली. हे पत्र पालकमंत्राच्या आदेशानुसार दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. विजय चौगुले विरोधी गटाने हे सर्व सिद्धीस नेण्याची चर्चा जोर धरत आहे. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा फटका सेनेला चांगलाच बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खरा शिवसैनिक मात्र यात भरडला जात आहे.


शितयुध्दामुळे पक्ष बदनाम


विजय नाहटा आणि विजय चौगुले यांच्यातील शितयुध्दामुळे पक्ष बदनाम होत आहे. जर या पत्राचा छडा लागला नाही आणि स्थायी समिती सदस्य निवड झाली तर विरोधी पक्ष नेते असलेले विजय चौगुले हे नगरसेवकांचा गट घेवून पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात असल्याची जोरदार चर्चा आहे.