अपयशाला कोणीच साथी नसतो पण..` संकटकाळात केएल राहुलला मिळाली `या` व्यक्तीची साथ
IPL 2024 KL Rahul: लखनौची टीम या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. असे असले तरी ते त्याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
IPL 2024 KL Rahul: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 17 वा हंगामा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. या सिझनमध्ये मुंबईची टीम कमाल करु शकली नाही, हा मुंबईच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. दुसरीकडे लखनौच्या चाहत्यांचीदेखील निराशा झाली. गेल्या दोन हंगामात बऱ्यापैकी कामगिरी केलेली लखनौची टीम यावेळेस अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल अशा चाहत्यांना विश्वास होता. पण टीमने मागच्या सिझनच्या तुलनेत यावेळी मैदानावर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. लखनौ सुपर जायंट्सची टीम केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळतेय. त्यामुळे केएल राहुल टीकेचा धनी होतोय.
लखनौची टीम या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. असे असले तरी ते त्याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शेवटचा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता असेल. स्वत:सोबत टीमच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार केएल राहुललाही टीकेला सामोरे जावे लागत आहे.
फलंदाजीदरम्यान त्याचा खराब स्ट्राइक रेट असल्याने केएल राहुलला सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. त्यात संघ मालक आणि केएल राहुलच्या बोलण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. चहुबाजूने केएल वर टीका होतेय. अपयशाचा वाटेकरी कोणी नसतो, याची प्रचिती त्याला येतेय. असे असताना एक व्यक्ती केएलच्या पाठीमागे उभी राहताना दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे टीमचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर. ते केएलच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी काय भूमिका घेतलीय? जाणून घेऊया.
17 व्या हंगामातील शेवटचा साखळी सामना
लखनौ सुपर जायंट्सची टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळतेय. या सामन्यापूर्वी टीमकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एलएसजी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी केएल राहुलच्या खराब स्ट्राईक रेटबाबत भाष्य केले. केएलवर झालेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
केएल राहुलवर फलंदाजासोबतच कर्णधारपदाची जबाबदारीही आहे. टूर्नामेंटमध्ये त्याने इतकी चांगली कामगिरी केली नाही असं म्हणणे खूप सोपे आहे. पण जर तुम्ही राहुलच्या धावा पाहिल्या तर तो इतरांपेक्षा खूपच चांगला दिसतोय, असे लान्स क्लुसनर यांनी म्हटले.
केएल राहुलने ज्या परिस्थितीत या धावा केल्या त्याकडेही लक्ष दिले पाहिजे . अनेक वेळा लवकर विकेट पडल्यामुळे त्याला डाव सांभाळावा लागला. त्यामुळे तो त्याच्या नैसर्गिक खेळाच्या विरुद्ध फलंदाजी करताना दिसल्याचे ते म्हणाले.
17 व्या हंगामातील शेवटचा साखळी सामना
आयपीएलच्या या मोसमात केएल राहुलच्या बॅटने केलेल्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 13 डावात 35.77 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट निश्चितपणे 136.36 आहे. आतापर्यंत या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 7 व्या क्रमांकावर आहे.
केएल राहुलच्या बॅटमधून 3 अर्धशतकांच्या खेळीही पाहायला मिळाल्या आहेत. राहुल आता मुंबईविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करून 500 हून अधिक धावा करून या मोसमाचा शेवट करण्याचा प्रयत्न करु शकतो.