कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड, झी मीडिया : खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीनंतर कोणत्या शहरावर प्रेम असेल तर ते म्हणजे पिंपरी-चिंचवड. पण या शहरावर दादा नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची साथ भारतात आल्यानंतर अगदी सुरुवातीपासून पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण सापडले. काही जणांचा बळीही गेला. असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार या काळात केवळ एकदाच शहरात आले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली. 


पूत्र पार्थ यांचा लोकसभा निवडणुकीतला पराभव दादांच्या जिव्हारी लागल्याचं विरोधक उघडपणे सांगतायत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच शहराचा दौरा केल्यानंतर याला अधिक धार आली आहे. मुलाचा पराभव झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना वेठीला धरण्याचं काम पालकमंत्री करत असल्याचा आरोप स्थानिक भाजपने केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही खासगीमध्ये हे मान्य करतात. लोकसभा निवडणुकीला पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल १ लाख ३८ हजार मतांची आघाडी घेतली. पार्थ यांच्या पराभवाला हा फरक कारणीभूत ठरला. त्यामुळे शहरातल्या पक्षाच्या नेत्यांवर दादा नाराज असल्याचं बोललं जातंय. अर्थात हे नेते जाहीरपणे असं काहीही नसल्याचं सांगतात.


पिंपरी-चिंचवडवर दादा नाराज आहेत का नाही? हे त्यांच त्यांनाच माहिती. पण पूर्वीइतके ते शहरात येत नाहीत, हेदेखील खरं. पार्थ पवारांच्या पराभवावर अजित पवार अजून नाराज आहेत का? आणि असलेच तर ते जनतेवर का राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर? याचं उत्तर अजित पवारांनाच माहित. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचं पिंपरी-चिंचवडवर जे लक्ष होतं, ते कमी झालंय हे तितकंच खरं.