बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन उमेदवारी जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादीमधील गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता अक्षय मुंदडा यांच्या फेसबुक पोस्ट वरून शरद पवार आणि राष्ट्रवादीचे चिन्ह गायब झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 


राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या चिन्हावर केज विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांसोबत सुद्धा मुंदडा कुटुंबाचे फारसे जमलेच नाही.


गेल्या साडेचार वर्षात मुंडे आणि सोनवणे यांनी मुंदडा यांना प्रत्येक ठिकाणी विरोध केला. मात्र, शरद पवार यांच्यासाठी निष्ठा मुंदडा यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. पवार बीडला आले होते तेव्हा देखील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घरी मुंदडा-मुंडे यांच्यातील वाद समोर आला होता. त्यामुळेच शरद पवार यांनी बीडमध्ये ५ जणांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. 


त्यानंतर नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टमधून पवार आणि घड्याळ गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या एक दोन दिवसात मुंदडा यांचा भाजप प्रवेश आणि केजमधून उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा आहे.