जालना : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं नीती आयोगाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाजही नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असंही नीती आयोगानं सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. 


नीती आयोगचं पत्र जून महिन्यातलं


दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. नीती आयोगाचा अलर्ट आजचा नाही, केंद्राला आलेलं पत्र जून महिन्यातील आहे, सद्यस्थितीत राज्याला कुठलाही अलर्ट किंवा इशारा नाही, तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली आहे असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. 


आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी पूर्ण केली आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असं टोपे यांनी म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज आणि निरीक्षण सुरू असून त्यानुसारच शाळा आणि मंदिरं उघडण्याचा निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.