COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग  : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे... यंदा गणपतीसाठी कोकणात विमानानं जाणं शक्य होणार आहे.... यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत सिंधुदुर्ग विमानतळाचं काम पूर्ण होणार आहे.....त्यामुळे चारपदरी महामार्ग, सागरी महामार्ग, बोटीचा प्रवास या सगळ्यांच्या अगोदर हवाई प्रवासाचे सुख चाकरमान्यांना यंदाच्या गणेशोत्सवात लाभणार आहे. मुंबईच्या गर्दीतही ओळखू येणारा चेहरा म्हणजे चाकरमान्यांचा... मुंबईत राहूनही कोकण आणि संस्कृती जपणारा हा गाववाल्यांचा चेहरा.. पण हे चेहरे आता आनंदून गेलेत.. आणि याला कारण म्हणजे चाकरमान्यांच्या लाडक्या गणपतीच्या सोहळ्यात यंदा विमानाने जाता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात होऊ घातलेले चिपी विमानतळ  हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या  विकासातील शिरोमणी ठरणार आहे. ३० जून २०१८ पर्यंत हा विमानतळ सुरु करण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या या विमानतळामुळे कोकण विकासाच्या मार्गातील महत्वाचं पाऊल  ठरणार आहे. सध्या राज्याच्या राजधानी  मुंबईत रस्त्याने पोहोचायला १० ते १२ तास लागत आहेत. तर रेल्वेने याच प्रवासाला आठ तास लागतात. पण याच तासातासाच्या प्रवासाला  चिपी विमानतळ पूर्ण झाल्यावर अवघ्या ४५ मिनिटात मुंबईत पोहाचता येणार आहे.  रेल्वेच्या तिकीटांच्या रांगा, महामार्गाचे रखडलेले काम आणि वाहतूक कोंडी या सगळ्यात अडखळलेल्या कोकण प्रवासाला आता आभाळ मोकळे झालेय हे मात्र नक्की...