मुंबई - देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर पुन्हा एकदा राम मंदिराचा विषय ऐरणीवर आला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा जुना मित्र पक्ष शिवसेनेने तर हा विषय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी 'एएनआय'ला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा विषय न्यायालयाच्या निकालानंतरच सोडवला जाईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी अध्यादेश आणणार नसल्याचे मोदी यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. आता याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, याचा कायदेशीर अर्थ इतकाच आहे की प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपला टोमणा मारला आहे. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सध्याकाळी केलेल्या दोन ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, राम मंदिर हा तातडीचा विषय नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. नरेंद्र मोदी यांनी तरी वेगळे काय सांगितले. पण या प्रकरणी भूमिका स्पष्ट केल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, याचा अर्थ श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत. 



नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध विषयांवर आपली मते पहिल्यांदाच जाहीरपणे मांडली. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभव, राफेल करारावरून होणारी टीका, शेतकऱ्यांचे प्रश्न, आगामी लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून होणारे आरोप, सर्जिकल स्ट्राईक या सर्व मुद्द्यांवर स्पष्टपणे मते मांडली. सुमारे ९५ मिनिटांची ही मुलाखत मंगळवारी संध्याकाळी वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला टोमणा मारला. 
राम मंदिरासाठी अध्यादेश काढा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी अयोध्या दौरा केला होता. पंढरपूरमधील पक्षाच्या जाहीरसभेतही त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा मांडला होता.