भाजप आमदाराचे बेताल वक्तव्य, महिला तहसिलदाराला म्हणाले `हिरोईन`
बेताल वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
जालना : माजी पाणी पुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परतूर तालुक्यातील कऱ्हाळा येथील 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात आपल्या भाषणात आमदार लोणीकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला तहसीलदार रूपा चित्रक यांचा चक्क 'हिरोइन' असा उल्लेख केलाय.त्यांच्या याच बेताल वक्तव्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय. त्यामुळे लोणिकरांच्या या बेताल वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकेचा सूड उठलाय.
वादग्रस्त विधान
हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतुरला करायचा का ? तुम्ही ठराव सगळ्याच सरपंचांनी आपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, प.समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो.
अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला पंचवीस हजार लोक आले, पन्नास हजार लोक आले. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा, तुम्ही सांगा कुणाला आणायचं, तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मंग एखादी 'हिरोइन' आणायची तर 'हिरोइन' आणा, नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच. त्या निवेदन घ्यायला येईल तुमचं...
लोणीकरांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला जात आहे.