नितेश महाजन, झी मीडिया, जालना : रत्नागिरीत सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. वाशिम पॅटर्न राबवून हा जिल्हा देखील कोरोनामुक्त केल्याची बातमी पसरलीं राज्यभरातून या जिल्ह्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. आता जालना देखील कोरोनामुक्त झालाय. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करत हे जिल्हे कोरोना संकटातून स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह महिला होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता शून्य झाल्याने जालना जिल्हा कोरोनामुक्त झालाय.


सध्या घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्हीही कोरोनाग्रस्त महिलांचे अहवाल आज घाटी रुग्णालयाला प्राप्त झाले. हे दोन्हीही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिलीय. दरम्यान यानंतर देखील प्रशासनाला नागरीकांनी सहकार्य करण्याचं आवाहन डॉ.राठोड यांनी केले आहे.



वाशिम पॅटर्न 


वाशिम जिल्ह्यात कोरोनाची लागण असलेला एकमेव रुग्ण ३ एप्रिलला आढळून आला होता. या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तब्बल २१ दिवस उपचार करण्यात आले. या रुग्णाला आज जिल्हा प्रशासनातील अधिकारी, डाँक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून निरोप दिलाय. उपस्थित वैधकीय सेवकांनी या रुग्णाला पुष्पगुच्छ, मास्क आणि सॅनिटायझर भेट वस्तू म्हणून दिल्या. 


या रुग्णाला पुढचे चौदा दिवस घरी गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. एकमात्र बाधित रुग्ण बरा झाल्याने वाशिम पॅटर्न यशस्वी ठरलाय.  मात्र यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी आणि जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.


'रत्नागिरीकरांची जबाबदारी वाढली'


रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या नियमांचे कोणीही उल्लंघन करु नये. रत्नागिरीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच सहकार्य ३ मेपर्यंत करावे, असे आवाहन उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता आपली जबाबदारी वाढली, असे सामंत म्हणालेत.