दारु भट्टीचा पंचनामा करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका हिसोडा बुद्रुक गावात ही घटना घडली.
विशाल करोळे, झी मीडिया, जालना : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दरम्यान मद्य विक्री बंदीचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे. ही बंदी झुगारुन अवैध दारु विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. जालन्यामध्ये अवैध दारू भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे.
ही दारु भट्टी उद्धवस्त केल्यानंतर पंचनामा करायला गेलेल्या पोलिसांवर दारू भट्टी चालकासह जमावाने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका हिसोडा बुद्रुक गावात ही घटना घडली.
पारध पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांसह ४ कर्मचारी आणि पंचांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढवला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक एस के शिंदे जखमी झाले.
अवैध दारुसाठा पकडल्याने पंचनाम्यादरम्यान हा हल्ला झाला. रेणुकाई पिंपळगाव येथील रुग्णालयात पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.