जळगाव : नेतृत्वावरून माजीमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेलं हाडवैर जगजाहीर आहे. शनिवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्यात असलेल्या मतभेदाचे दर्शन पुन्हा एकदा झालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या भाषणादरम्यान खडसे आणि महाजन यांनी एकमेकांना जोरदार चिमटे काढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे मूल्यमापन करताना एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. तर गिरीश महाजन यांनी भाजप हा तत्त्व आणि सिद्धांतांवर चालणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीत निवडणुकीतील यश हे संपूर्ण पक्ष संघटनेचे असल्याचा उल्लेख करत खडसेंचा मुद्दा खोडून काढला.


लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे माझे किंवा तुमचे नाही. सर्वांच्या परिश्रमाचे ते म्हणता येईल. पण हे यश एका मंत्र्याचे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे, असे मानायला मी तयार नाही. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाचे हे यश आहे, असा उल्लेख खडसेंनी केला.


खडसेंनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून गिरीश महाजन आपल्या भाषणात म्हणाले की भाजप हा पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही. इथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे घराणेशाही चालत नाही. भाजप हा तत्व आणि सिद्धांतांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. जोपर्यंत कार्यकर्ता आहे; तोपर्यंत पक्षाला कोणीही मागे खेचू शकत नाही. उद्या मी असेल किंवा नसेल. दुसरे कोणी असेल किंवा नसेल, पण कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष राहणारच आहे. त्यामुळे मी गेलो म्हणजे पक्ष संपला, असे कोणी समजता कामा नये, या शब्दात महाजन यांनी खडसेंना चिमटा काढला.