वाल्मिक जोशी, झी 24 तास जळगाव: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबत कोणीतरी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. सुखंच नाही तर दु:खंही वाटून घेण्यासाठी कोणाचीतरी सोबत कायमच हवी असते. जळगावातील 75 वर्षांच्या आजोबांनाही हीच सोबत हवी होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि ते खूप एकटे पडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला प्रत्येक दिवस आपण आपल्या व्यक्तीसोबत शेअर करू शकत नाही याची खंत या आजोबांना होती. अखेर या आजोबांना त्यांचं एकटेपण दूर करण्यासाठी साथ मिळाली ती 66 वर्षांच्या आजींची. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये एका विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली. दोघेही दरवर्षी मुक्ताईच्या वारीला जातात.


किनगाव येथील 75 वर्षीय वर आणि जामनेर येथील 66 वर्षीय वधू लग्नबंधनात अडकले. त्यांच्या विवाह सोहळ्याला त्यांची मुले, जावई, नातवंडे उपस्थित होते. किनगाव येथील पुंडलीक तायडे यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. तर जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर सुद्धा एकाकी जीवन जगत होत्या. 


किनगाव येथील तायडे यांच्या पत्नी वत्सला तायडे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यांना 2 मुलं, 3 मुली, सुना, जावई नातवंडे आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. पत्नी सोडून गेल्यानं पुंडलीक हे एकडे पडले होते. 


वडिलांनी आपल्याकडे  राहायला यावे असा मुलांचा आग्रह आहे. मात्र, पुंडलिक तायडे यांचा जीव गावातल्या मातीत अडकला आहे. त्यामुळे मुलासोबत जाण्यासाठी ते तयार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घ्यायला आपलं माणूस असायला हवं असं सगळ्यांनाच वाटत होतं. 


दुसरीकडे जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर यांना देखील वैधव्य आले आहे. मूलबाळ नसल्याने त्या एकाकी जीवन जगत होत्या. अशा दोघा ज्येष्ठांचा अनोखा विवाहसोहळा जामनेरातील संत रोहिदास महाराज मंदिरात पार पडला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.


किनगावचे पुंडलिक तायडे व जामनेरच्या चंद्रभागा सुरळकर हे दोन्ही वारकरी आहेत. दोघं आपापल्या गावातील वारकऱ्यांसोबत दरवर्षी न चुकता मुक्ताईच्या वारीला जातात. तिथेच दोघांची ओळख झाली. उतारवयात हक्काचा साथीदार असावा म्हणून दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव जामनेरातील वारकरी सिंधूताई सपकाळ यांनी ठेवला. या प्रस्तावाला अन्य वारकऱ्यांनीदेखील पाठबळ दिले. दोघांनीही आपापले कुटुंबीय आणि नातेवाइकांशी चर्चा करून विवाहाचा निर्णय घेतला.