सख्खे भाऊ धरणात पोहोयला गेले पण परतलेच नाहीत, पाण्याचा अंदाज चुकला आणि...`
Brothers Death Drowned In Bhokarbari Dam: पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला.
वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव: पाण्याचा अंदाज येत नसेल तर धरणात उतरणे टाळा,असे आवाहन वारंवार करण्यात येते. पण याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यात आता आणखी एक घटनेची भर पडली आहे. पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेत तिघांचा मृत्यू झालाय तर दोनजण बचावले आहेत. मृत पावलेल्यांमध्ये मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन हा 12 वर्षांचा, मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन हा सोळा वर्षाचा असून दोघेही पारोळातील बडा मोहल्ला येथे राहणारे होते. तर आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन हा 14 वर्षांचा मुलगा नाशकातील मालेगावमध्ये राहायला होता.यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्यांचा आतेभाऊ होता. आवेशदोन दिवसांपूर्वीच मालेगावहून पारोळा येथे आला होता. पारोळा शहरातील बडा मोहल्ला भागातील मुले भोकरबारी धरणाकडे पोहायला गेले होते. तिथे हे तिघेजण पाण्यात उतरले. तिघांनाहीही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.यामुळे ते बुडत गेले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी ओरडायला सुरुवात केली.त्यांच्यासोबत असलेल्या अश्रफ पीर मोहम्मद आणि इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यात यश आले नाही.
कशी आहे पावसाची स्थिती?
मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केलाय. मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पालघर, पुणे, साता-यात रेड अलर्ट आहे. तर मुंबईतही आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड, नाशिक, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलाय. तर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे. हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अलिबाग, पेण , कर्जत, खालापूर, खोपोली भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळतंय पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यात उपनगरासह घाटमाथ्यावरपावसाचा जोर कायम आहे. विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे.त्यामुळे खडकवासला धरणातून २७०१६ कयूसेक विसर्ग सोडण्यात आलाय तर भाटघर धरणातून १९०१२कयूसेक ने विसर्ग सुरू आहे. पुण्यात घाटमाता आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने डेक्कन परिसरातील नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीये.सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीमध्ये पुराचे पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय. सुरक्षेच्या कारणास्तव पुलाची वाडी, प्रेमनगर तसंच एकतानगरीमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय.
गावांना सतर्कतेचा इशारा
मुळशी तालुक्यातील चाळीस गावांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी व औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे मुळशी धरण शंभर टक्के भरले. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरणात पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये 24 हजार 745 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी मुळशी मधील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुळशी टाटा धरण प्रशासनाने दिला आहे.