एकदम फिल्मी स्टाईल! बुरखा घातला, हातात पिस्तूल घेतलं, मुलाच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी कोर्टात शिरला आणि...
मुलाच्या हातून खून, मग मुलाचा खून, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वडिलांनी रचला कट, न्यायालयाच्या परिसरात फिल्मी स्टाईल घटना
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : भुसावळमध्ये एकदम फिल्मी स्टाईल गुन्हेगारी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा थरार घडण्याआधीच आरोपीला अटक करण्यात आली. भुसावळमध्ये 2020 मध्ये झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी नशिराबाद इथं धम्मप्रिय सुरडकर याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. धम्मप्रियच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली, पण त्याला संपवण्यासाठी मुलाच्या वडिलांनी बुरखा परिधान करत न्यायालय परिसरात एन्ट्री केली. न्यायालयाच्या आवारातच मारेकऱ्याला संपवण्याचा कट आखला गेला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच कट उधळला गेला आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली.
काय आहे नेमकी घटना
भुसावळमध्ये लहान मुलांच्या भांडणातून 11 ऑक्टोबर 2020 रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीत धम्मप्रिय मनोहर सुरडकर याला पोलिसांनी अटक करत कारागृहात रवानगी केली. पुढे एक वर्षाने म्हणजे 21 सप्टेंबर 2021 मध्ये त्याला न्यायलयाने जामीन मंजूर केला. जामिनावर सुटून 22 सप्टेंबर 2021 रोजी तो आणि वडील मनोहर आत्माराम सुरडकर दुचाकीने घरी जात होते. नशिराबाद इथं सूनसगाव इथल्या रस्त्यावर एका टपरीवर थांबले असताना तीन तरुणांनी दोघांवर हल्ला केला. धम्मप्रिय याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडिल म्हणजे मनोहर सुरडकर जखमी झाले.
मुलाच्या मारेकऱ्याला संपवण्याचा कट
धम्मप्रियच्या हत्येप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यापैकी दोघे सध्या जामिनावर असून शेख शमीर उर्फ समीर उर्फ भांजा शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन या दोघांची सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रिय याचे वडील मनोहर यांनी रचला होता.
पोलिसांनी उधळला कट
मनोहर सुरडकर याने मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चौघांच्या मदतीने एक कट रचला होता. सोमवारी समीर आणि रेहान यांना जिल्हा न्यायालयात आणण्यात येणार होते. तत्पूर्वी मनोहर याने दोन गावठी बनवटीची पिस्तूल खरेदी केली. सोमवारी मनोहर आणि एक साथीदार बुरखा परिधान करुन महिलेच्या वेशात भुसावळहून जळगावात आले. बुरखा, महिलेचे बूट आणि पर्स घेऊन दोघे जिल्हा न्यायालयाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर पोहचले. त्यांचे हावभाव संशयास्पद वाटत होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मनोहरला ताब्यात घेतलं असता,त्याच्याजवळच्या पर्समध्ये एक पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुस आढळून आली.