वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव: पठाणकोट इथे कर्तव्य बजावत असताना जवानाला वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंग परदेशी असं नाव आहे. मंगल सिंग विजय सिंग परदेशी शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील मंगल सिंग विजय सिंग परदेशी यांना पाक सीमेवर पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं. आज सकाळी दीड वाजेच्या सुमारास त्यांना गोळी लागल्याचे आढळून आल्या नंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.


मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना उपचारा दरम्यान त्यांना वीरमरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वीर जवान मंगलसिंग परदेशी हे सैन्य दलात ई एम इ मध्ये नायक पदावर कार्यरत होते.


वयाच्या 18 व्या वर्षीच ते सैन्य दलात भरती झाले होते.  पाचोरा तालुक्यात सावखेडा परिसरात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. मंगलसिंग यांना लहानपणापासून देश सेवेची आवड होती.


मंगल सिंग यांच्या पश्चात आई वडील दोन मोठे भाऊ पत्नी आणि तीन अपत्य असा परिवार आहे. 16 नोव्हेंबर रोजी पाचोरा तालुक्यातील सावरखेडा इथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.