मराठवाड्यातून थेट मुंबई, दिल्लीत येणं होणारं सोपं! महाराष्ट्राला केंद्राकडून मिळालं गिफ्ट
Jalna-Jalgaon New Railway line: जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे.
Jalna-Jalgaon New Railway line: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पिछेहाटीनंतर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लोकाभिमूख निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक गिफ्ट मिळणार आहे.जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत. नव्या 174 किमी रेल्वे मार्गासाठी तब्बल 7 हजार 105 कोटी रुपये मंजूर केले आहेत.या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्रासोबत जोडले जाणार आहे.युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या अजिंठा लेण्यांसोबत जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे राजूर गणपती या पवित्र तीर्थक्षेत्राच्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.मराठवाड्याला थेट मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या महानगरांच्या मार्गाशी जोडले जाणार आहे.
काय म्हणाले फडणवीस?
केंद्राने महाराष्ट्राला आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. जालना-जळगाव नव्या रेल्वे लाईनमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडला जाणार आहे.
24 हजार 657 हजार कोटींचे प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 8 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी 24 हजार 657 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आल्याचे ते म्हणाले.या प्रकल्पात आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रमाणात प्रकल्प देण्यात आले आहेत.ओडिसात तीन मोठे प्रकल्प देण्यात आले आहेत.झारखंड आणि बिहारला जोडणारा गंगा नदीवर ब्रीज लाईन टाकली जाणार आहे. हा प्रकल्प 26 किमीचा असेल, असेही त्यांनी सांगितले.
कोणाला होणार फायदा?
मराठवाड्यामध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखली जाणारी अजिंठा लेणी आहे. तसेच तीर्थक्षेत्र असलेले राजूर गणपती हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येता. या नव्या रेल्वे मार्गामुळे ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्ग झाल्यास याचा फायदा मराठवाडा आणि खान्देश भागातील स्थानिकांना उद्योजकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना होणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा आहे.
केंद्रीय रेल्वे विभागाची जबाबदारी
हा प्रकल्प केंद्रीय रेल्वे विभागामार्फत पूर्णत्वास येणार आहे. जालना-जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा एकूण प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के खर्च म्हणजेच 7 हजार 105.43 कोटींपैकी 3 हजार 552.715 कोटी रुपयांचा हिस्सा आहे. यात जमिनीची किंमत अंतर्भूत असेल.