नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यामध्ये (Jalna) वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हा महासचिवाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव असे वंचितच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. जालन्याच्या रामनगर साखर कारखाना परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जमिनीच्या वादातूनच त्यांची हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जालना पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालन्यातील रामनगर भागातील मंठा रोड लगत असलेल्या जमिनीवर संतोष आढाव यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष आढाव यांच्या गायरान जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सात आठ जणांनी केलेल्या मारहाणीत संतोष आढाव यांचा मृत्यू झाला आहे. जालना पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे.


जालना शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथील मंठा रोड असलेल्या गायरान जमिनीच्या मालकीच्या वादावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष आढाव यांना सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत आढाव यांच्यासह इतर दोन जण देखील गंभीर जखमी झाले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आढाव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


जालण्याच्या हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष आढाव आणि त्यांचे काका निवृत्ती आढाव यांच्यांत रामनगर शिवारातील गायरान जमिनीवरून वाद सुरू होता. या जमिनीच्या वादातूनच संतोष आढाव, त्यांचा भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे यांना सात ते आठ लोकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संतोष आढाव यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे भाऊ संजय व सिद्धार्थ मगरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.


"संतोष आढाव यांच्या गायरान जमिनीमध्ये त्यांनी दुकानाचे गाळे काढण्यात आले होते. संतोष आढाव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आम्ही चौकशी करतो असे सांगितले होते. त्यानंतरही काम सुरुच होते. त्यानंतर आम्ही जमिनीवर गेलो आणि असे करु नका सांगितले. त्यानंतर पाच ते सहा जणांनी आणि तीन महिलांनी संतोष आढाव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अर्धा तास संतोष यांना लोखंडी रॉडने मारहाण सुरु होती. मी वाचवण्यासाठी गेलो असता मलाही मारहाण करण्यात आली," अशी माहिती संतोष आढाव यांचे नातेवाईक सिद्धार्थ मगर यांनी दिली.