नितेश महाजन, झी मीडिया, जालना: आतापर्यंत आपण अनेकवेळा सिनेमामध्ये एखादी विहीर ही मृत्यूचं कारण ठरणारी असल्याचा सीन पाहिला असेल. पण प्रत्यक्षात अशी विहीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्यातील जामवाडी गावात खुनी विहीर तयार झाली आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरं आहे. गंभीर बाब म्हणजे ही खुनी विहीर मानवनिर्मित आहे. 


घटना क्रमांक 1 -12 फेब्रुवारी 2021 - जालन्यातील जामवाडी गावाजवळ रस्त्यालगतच्या विहिरीत सायंकाळी 7 वाजता कार कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.


घटना क्रमांक 2 - 14 फेब्रुवारी 2021 - सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान शेगावहून औरंगाबादकडे जाणारी कार याच विहिरीत कोसळून दोन जण दगावले. 


वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यामधील सिंगडोह गावातलं फांदडे कुटुंब सकाळी शेगावहून औरंगाबादकडे जात होतं. त्यावेळी जालन्यातील जामवाडी गावाजवळ रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळली. 


या अपघातात 30 वर्षीय आरती फांदडे आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी माही फांदडे यांचा मृत्यू झाला. तर गोपाल फांदडे, वेदिका फांदडे आणि जय वानखेडे हे तिघा जखमी झाले. सध्या जालना-खामगाव या महामार्गाचं काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे कंत्राटदारच या अपघाताला जबाबदार असल्याचं सांगत, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी जामवाडीच्या गावकऱ्यांनी केली आहे.


कंत्राटदारावर कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी जामवाडीच्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केलं. यावेळी मदतकार्यात उशिरा येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खरपूस समाचारही गावक-यांनी घेतला. 


गेल्या २ वर्षांपासून या महामार्गाचं काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे हकनाक चार जणांना जीव गमवावा लागलाय. कंत्राटदाराने विहिरीजवळच्या भागातल्या रस्त्यावर वेळीच बॅरीकेट्स लावले असते, तर या दोन्हीही अपघाताच्या घटना टळल्या असत्या.