जलयुक्त शिवारामुळे पाणीप्रश्न सुटला, चक्क रांगोळी काढून पाण्याचं स्वागत
पाण्याचं स्वागत कधी रांगोळी काढून केलेलं पाहिलंय का?
निलेश खरमरे, झी मीडिया, भोर : पाण्याचं स्वागत कधी रांगोळी काढून केलेलं पाहिलंय का? महाराष्ट्रातलं एक गाव पाण्याचं स्वागत चक्क रांगोळी काढून करतं आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
पुणे जिल्ह्यातली अतिदुर्गम भागातील निवंगण आणि गढे गाव. दरवर्षी या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. उन्हाळा सुरू होताच अनेक कुटुंब पाणी नसल्याने गाव सोडतात. यंदा मात्र, गावातलं चित्र वेगळंच आहे. गावात पाणी येणार म्हणून गावकऱ्यांनी रांगोळी काढून पाण्याचं स्वागत केलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून कृषी विभागाने बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे निवंगण आणि गुढे या दोन्ही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. महिल्यांच्या डोक्यावरील हंडा आता दारात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो आहे.
खरंतर हा बंधारा 2016 आणि 17 मध्ये कृषी विभागाकडून कच्च्या स्वरूपात बांधण्यात आला होता. पाणीसाठा चांगला होत असल्याने शासनाच्या पाच कार्यालयांनी एकत्र येऊन योग्य नियोजन करून उत्तम असा हा निवंगणचा बंधारा उभारला. या बंधाऱ्यामुळे शेती, गुरेढोरं आणि वन्यजीवांचीही ही तहान भागते आहे.