कर्तव्य बजावताना अंगावर वीज पडून जवानास वीरगती
शहीद जवान मल्हारी लहिरे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
निलेश वाघ, झी २४ तास, मनमाड : मनमाडच्या कऱ्ही गावाचे भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यातील जवान मल्हारी खंडू लहिरे यांना कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून वीरगती प्राप्त झाली. त्यांचे पार्थिव रात्री कऱ्ही या त्यांच्या गावी आणले असून आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवान मल्हारी लहिरे यांच्या निधनाने नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे
गुजरातच्या जामनगर येथे जवान शुक्रवारी दुपारी एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करताना ही दुर्घटना घडली. मल्हारी लहिरे सन २०१२ साली सैन्य दलात भरती झाले होते. छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी भागात देशसेवा बजावली होते. सध्या ते गुजराथ राज्यातील जामनगर येथे विमान हल्ला प्रतिरोधक बटालियनमध्ये कार्यरत होते. जामनगरच्या एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करत होते.
उंच ठिकाणावर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्यावर वीज पडल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली. जवान मल्हारी लहिरे यांच्या लग्नाला जेमतेम चार वर्ष झाली असून त्यांना अवघा दोन वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे पत्नी सोनालीमुलगा सार्थकला घेऊन रविवारी जामनगरला त्यांच्याकडे गेल्या होत्या. जवान मल्हारी लहिरे हे आपल्या पत्नी, मुलगा कुटुंबासह फॅमिली क्वार्टमध्ये शिफ्ट झाले होते. लग्नानंतर पत्नी आणि मुलांसोबत पहिल्यादाच युनिटमध्ये क्वार्टर भेटले होते.
पण कुटुंबासोबतच्या फक्त पाचव्या दिवशी कर्तव्यावर असताना त्यांचा वीज पडून मृत्यू झाला आणि त्यांना वीरगती मिळाली त्याच्या पश्चात आई - वडील व पत्नी व लहान मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे त्यांचे पार्थिव कऱ्ही या त्यांच्या गावी आणले असून आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवान मल्हारी लहिरे यांच्या निधनाने कऱ्ही गावच नव्हे तर नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे