औरंगाबाद : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरण तुडुंब भरलं असून यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. जायकवाडी धरणातून शनिवारी साडे बाराच्या सुमारास दोन दरवाजे उघडण्यात आले. १० आणि २७ हे दोन दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडून एकूण १०४८ क्यूसेक विसर्ग गोदवारी पात्रात सोडण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्यस्थितीत जायकवाडीच्या २२ पैकी १० आणि २७ या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्यूसेक आणि जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक, इतका एकूण २६३७ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. जायकवाडीतील पाणी साठा 98 टक्के इतका झाला आहे.


जायकवाडी धरणातून औरंगाबाद आणि जालना शहर आणि २००हून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, लाखो हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली येईल. जायकवाडीचे पाणी बीड- परभणी पर्यंत पाठवता येते.


दरम्यान, जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटणार असताना दुसरीकडे तीन जिल्ह्यांच्या 6 शहराची तहान भागवणारं मांजरा धरण जेमतेम 50 टक्के भरलं आहे. आता पाऊस आला नाही तर या धरणावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.