`...तेव्हा अजितदादांनी मिशी काढली होती का?`, `संन्यास घेईन..` वरुन जितेंद्र आव्हाडांनी उडवली खिल्ली
Jitendra Avhad On Ajit Pawar: झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी `टू द पॉईंट` कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
Jitendra Avhad On Ajit Pawar: अजित पवार वेशांतर करुन, नाव बदलून दिल्लीला जायचे आणि अमित शहांची भेट घ्यायचे अशा बातम्या माध्यमांतून समोर आल्या होत्या. दिल्लीतील बैठकीत पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना अजित पवार हे बोलल्याचे सांगितले गेले. दरम्यान विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत अजित पवारांना डिवचत देशाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केला. तर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतच हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर अजित पवार चांगलेच चिडलेले दिसले. त्यांनी यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रतिआव्हान दिले. पण आता त्यांचे जुने सहकारी असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी 'टू द पॉईंट' कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. ही मुलाखत आज रात्री 9 वाजता झी 24 तासवर पाहता येणार आहे.
'वेशांतराचे पुरावे दिल्यास संन्यास'
मी कुठेही वेशांतर करुन गेलो नाही. मी कुठेही नाव बदलले नाही. विरोधक टीका करत असतील तर त्यांनी तसे पुरावे द्यावे. तसे आढळल्यास मी राजकारणातून कायमचा सन्यास घेईन. अन्यथा विरोधकांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, असे आव्हान अजित पवारांनी केले. वेशांतरावरून जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावलाय. वेशांतराचे पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य दादांनी केलं होतं. त्यावर लोकसभेतील पराभवानंतर अजितदादांनी मिशी काढली होती का? अशा शब्दांत आव्हाडांनी खिल्ली उडवली.
काय आहे मिशी प्रकरण?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी मिशी कापून देईन, असे वक्तव्य केले होते. बारामतीमधील लोणी भापकरमधील प्रचारसभेत ते बोलत होते.10 वर्ष खासदार होते. त्यांनी काय काम केलं हे मला सांगावं मी म्हणेल ते ऐकेल. कामाच्या बाबतीत आपणच करू शकतो. काम करणार तर आपणच करणार, असे त्यांनी सांगितले. घड्याळाला मत म्हणजे आपल्या शेतीच्या पाण्याला मत आहे. आता तुम्ही काय करायचं ते ठरवा, असे ते म्हणाले. यापुढे बोलताना 7 तारखेनंतर एकजण जरी आला तर मी मिशी काढून देईल, असं चॅलेंज त्यांनी दिलं.
'..तर मिशी काढून देईन'
'ते आता नुसते येतात 7 तारीख होऊ दे एकजण जरी निवडून आला तरी मिशी काढून देईन. खोटं नाही सांगत. त्यांना काहीही पडलेलं नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदा आहे. आमच्या गाड्या विकायच्या आहेत. आमच्या शो रुमचं कोण पाहाणार. माझं कर्जत-जामखेडचं कोण बघणार? असे खोचक प्रश्न विचारत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. हे माझ्या घरातीलच आहेत. पण आता पोपटाप्रमाणे फार वळवळ-वळवळ, चुरचूर-चुरचूर चालणार नाही. तुम्ही माझ्या समोर आणि मी तुमच्या समोर येतो. बोलायला कोण ऐकंत ते बघूया, असे आव्हान त्यांनी दिले होते. उगीच आम्ही गप्प बसलोय. आपलेच दात आपलेच ओठ कुठं लोकांसमोर पंचनामा करायचा? असे त्यावेळी अजित पवार म्हणाले होते.
विरोधकांनी साधला निशाणा
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या तुलनेत पक्ष, चिन्ह गेल्यानंतरही शरद पवार गटाने राज्यात चांगलीच मुसंडी मारली होती. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचे विरोधक त्यांना मिशी कधी कापणार? म्हणत डिवचताना दिसले होते.