जितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांचा राडा
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर ठाण्यात वर्तक नगर पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. आव्हाडांच्या अटकेविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिला, यावरुन त्यांनाच अटक करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या सरकारमध्ये भर गर्दीत बंदूकीतून गोळी झाडणाऱ्या आमदाराला अटक केली जात नाही, सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ठाण्यातील (Thane) मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Viviana Mall) सिनेमागृहात 'हर हर महादेव सिनेमा'वरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.
जितेंद्र आव्हाड याचं ट्विट
ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी (Thane Vartak Nagar Police) ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनंगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी माणूस पाठवतो नाहीत तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला मिघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं त्यानंतर डिसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळयात आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होती. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तसंच हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. तसंच सरकारनं कट शिजवून मला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी मी जामीन मागणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये रात्री दहा वाजता हर हर महादेव या मराठी सिनेमाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्ते सिनेमागृहात शिरले आणि त्यांनी सिनेमाचा शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांनी विरोध केला असताना कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली. यानंतर मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी बंद पडलेला शो पुन्हा सुरु करत आव्हाडांवर जोरदार टीका केली होती.