विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातर्फे कळवा मुंब्रा भागातील 18 ते 25 वयोगटातील तरुणांना अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला 'जवान' (Jawan) हा  चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये (Multiplex) 10 दिवस इथल्या तरुणांना हा चित्रपटा दाखवला जाणार आहे. मात्र यावरुन आता बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांनी याच मल्टिनप्लेक्समध्ये त्यावेळी सुपर हिट ठरलेला मराठी चित्रपट 'हर हर महादेव' बंद पाडला होता. जबरदस्ती प्रेक्षकांना बाहेर काढले होतं. मात्र आता तेच आव्हाड एक हिंदी चित्रपट मोफत दाखवत आहेत असा आरोप करत शिंदे गटाने (Shinde Group) आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. आव्हाड यांनी मनस्थिती काय आहे, ते किती हिंदू विरोधी आहेत हे दाखवून दिलं आहे. स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवतात, पण ते कळवा मुंब्रापर्यन्तर राहिलेत अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. 


आव्हाड यांनी हा चित्रपट 10 दिवस मोफत दाखवला तरी तो बघायला तर कोणी तिकडे जायला पाहिजे ना, आव्हाड पब्लिसिटी साठी काहीही करतात, अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारा हर हर माहादेव चित्रपट ज्या ठिकाणी त्यांनी बंद पाडला त्या आव्हाडांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार, हिंदुत्वाचे कट्टर विरोधी म्हणून जर कोणाला नंबर द्यायचा असेल तर त्यात आव्हाड यांना एक नंबर द्यावा लागेल आशा विचारांचे आव्हाड आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार..याबद्दल उबाठावाल्यांच काय म्हणणं आहे ..हर हर महादेव बंद केला आणि जवान सुरू केला .मात्र तो जवान पाहायला जस शरद पवार यांच्याकडे आणि उबाठाकडे आमदार राहिलेलं नाहीयेत तशीच गत आव्हाडांची झालीय. त्यामुळे उरलेल्या सुरलेल्यांचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत असा टोलाही म्हस्के यांनी लगावला आहे. 


जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
कॉलेज जीवनातील विद्यार्थ्यांना जवान चित्रपट फ्री मध्ये दाखवणार असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. 18 ते 25 वयोगटातील मुलांना  शाहरुख खानचा  'जवान' चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कळवा आणि मुंब्रामधील कॉलेज विद्यार्थ्यांना हा चित्रपट फ्रीमध्ये दाखविण्यात येणार आहे. 'पहिली बॅच उद्या संध्याकाळी 7 वाजता 'जवान' चित्रपटाचा शो ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन बघतील' असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.