व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे यांच्यात चांगली जुंपली आहे. आव्हाड यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर आव्हाडांनी थेट ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल केलाय. हे चॅट नेमके कुठून आले, यावरून आता आव्हाड आणि ठोंबरे यांच्यात जुंपली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपाली ठोंबरेंना आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नावानं एक व्हाट्सअप चॅट व्हायरल करणं महागात पडलं आहे. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हाट्सअप चॅट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर चॅट कुठून मिळालं हे रुपाली ठोंबरे यांनी सांगावं, असं आव्हान जितेंद्र आव्हाड दिलं आहे. 



मात्र रुपाली ठोंबरे यांनी यावरून आव्हाडांनाच प्रतिहल्ला केलाय. जितेंद्र आव्हाडांनीच चॅट व्हायरल केल्याचा दावा ठोंबरे यांनी केलाय. आव्हाड आणि ठोंबरे यांच्या वादात खासदार सुनील तटकरेंनी उडी मारली आहे. या व्हायरल चॅटची चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. 


जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला होता. ठोंबरे यांनी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला. जितेंद्र आव्हाडांनी थेट बीडमध्ये ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता हे प्रकरण कुठलं वळण घेणार, हे पाहावं लागणार आहे.