जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे; ठाणे पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र
अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी 500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
5 एप्रिल 2020 रोजी आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी बंगल्यावर नेऊन करमुसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातलं हे चौथं आरोपपत्र असून, त्यात आव्हाड यांच्यावर 120 ब आणि 364 अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी 90 दिवसात हे आरोपपत्र दाखल केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांना झाली होती अटक
या प्रकरणी जितेंद्र आव्हाड अटक देखील झाली होती. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणा-या अनंत करमुसे नावाच्या व्यक्तीचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. आरोपानंतर जितेंद्र आव्हाड स्वतः वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथं त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना कोर्टापुढं हजर करण्यात आलं. कोर्टानं 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली होती.
साक्षीदाराने आत्महत्या केल्याने प्रकरणाचा गुंता वाढला
जितेंद्र आव्हाड यांचा माजी बॉडीगार्ड वैभव कदमने आत्महत्या केल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता. तळोजा रेल्वे स्थानकाजवळ त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. ट्रेनच्या धडकेनं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम अहवालात म्हटल. अनंत करमुसे मारहाणीवेळी वैभव कदम जितेंद्र आव्हाड यांचा बॉडीगार्ड होता. अनंत करमुसे प्रकरणात वैभव कदमलाही आरोपी करण्यात आलं होते. सध्या ठाणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. आत्महत्या करण्या आधी वैभव कदम यांनी सोशल मीडियावर मी अपराधी नाही, अशी पोस्ट केली होती. कदम यांची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता.
सुप्रीम कोर्टाने दिला होता जितेंद्र आव्हाडांना दणका
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला होता. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी चौकशी करुन 3 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. घोडबंदरमध्ये राहणा-या अनंत करमुसेंनी एप्रिल 2020 मध्ये आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर तत्कालीन मंत्री असणा-या आव्हाडांनी निवासस्थानी नेत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करमुसेंनी केला होता.