ट्रकच्या मागे Horn OK Please असं का लिहितात? या OK चा नेमका अर्थ काय? कारण फारच रंजक

Why Horn OK Please Is Written On Backside of Trucks What It Means: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण 'Horn OK Please' हे वाक्य गाडीवर लिहिणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र तरीही जवळपास सर्वच ट्रकवर हे का लिहिलेलं असतं? जाणून घेऊयात या वाक्याचा अर्थ काय आणि ते का लिहिलं जातं...  

| Oct 07, 2024, 10:16 AM IST
1/8

hornokplease

तुम्ही भारतीय रस्त्यांवरुन प्रवास केला असेल तर अनेकदा तुमचं लक्ष ट्रकने वेधून घेतलं असेल. रंगीबेरंगी झिरमिळ्या, छान रंगकाम, नक्षीकाम, त्यावर मागील बाजूस लिहिलेली शेरोशायरी असा या ट्रकचा लूक असतो. मात्र या साऱ्यामध्ये ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेलं 'Horn OK Please' हे वाक्य आवर्जून दिसून येतो. पण हे वाक्य ट्रकवर का लिहितात तुम्हाला ठाऊक आहे का?  

2/8

hornokplease

खरं तर भारतीय ट्रक ओळखायचे असतील तर त्या ट्रकच्या मागील बाजूला 'Horn OK Please' हे वाक्य लिहिलं आहे का पाहा असंही म्हटलं जातं. मात्र हे वाक्य लिहिण्यामागील नेमकं कारण आणि लॉजिक फारच रंजक आहे. याच नावाने अगदी बॉलिवूडमध्ये एक चित्रपटही येऊन गेला आहे. पण हे तीन शब्द असं लिहिण्याचं कारण काय असतं ते पाहूयात...

3/8

hornokplease

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण 'Horn OK Please' हे वाक्य गाडीवर लिहिणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र हे वाक्य आलं कुठून याचे काही वेगवेगळे तर्क लावले जातात. त्यापैकी सर्वात लोकप्रिय तर्क हे दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातून आहे.

4/8

hornokplease

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इतर देशांप्रमाणे भारतामध्येही डिझेलची कमतरता निर्माण झाली. त्यावेळी उपलब्ध डिझेलमध्ये अत्यंत ज्वलनशील असं केरोसीन म्हणजेच रॉकेलची भेसळ करुन ते ट्रकमध्ये वापरलं जायचं. मात्र ट्रकमध्ये अत्यंत ज्वलनशील इंधन आहे हे तो ट्रक चालवणाऱ्या चालकाबरोबरच आजूबाजूच्या चालकांना आणि इतरांना कळावं म्हणून 'On Kerosene' असं ट्रकवर लिहिलं जायचं. पुढे पुढे या इशाऱ्याचं संक्षिप्त रुप 'OK' असं लिहिलं जाऊ लागलं. यातूनच आज आपण पाहतो त्या 'Horn OK Please'चा जन्म झाला.

5/8

hornokplease

अन्य एका दाव्यानुसार, 'Horn OK Please' या वाक्याचा जन्म टाटा समुहाच्या मार्केटींगमधून झाला आहे. टाटा पूर्वी स्टील, ट्रक आणि हॉटेल उध्योगामध्ये होते. त्यावेळी त्यांनी 'OK' नावाचा साबण बाजारात आणला होता. आधीपासूनच प्रस्थापित असलेल्या लाइफबॉयला आव्हान देण्यासाठी त्यांनी हा साबण बाजारात आणलेला. त्याचीच जाहीरात म्हणून ते ट्रकवर 'OK' हा शब्द लिहू लागले आणि पुढे त्याचं रुपांतर 'Horn OK Please' मध्ये झाल्याचं काहीजण मानतात.

6/8

hornokplease

आता या 'Horn OK Please' मधील OK चा अर्थ विवादीत असला तरी इतर दोन शब्दांचा अर्थ फारच स्पष्ट आहे. पूर्वी भारतामधील सर्व ट्रकला साईड मिरर नसायचे. त्यामुळे ट्रकच्या मागून एखादं वाहन येत असेल तर ते ट्रक चालकाला दिसायचं नाही. त्यामुळेच ट्रक मागून चालणाऱ्यांना 'Horn Please' असं सांगितलं जायचं. म्हणजेच तुम्हाला ट्रकला ओव्हरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवून ट्रक चालकाला सावध करा असं यामधून अभिप्रेत असायचं. 

7/8

hornokplease

हल्ली हॉर्न जास्त वाजवू नका असं सांगितलं जात असलं तरी सुरुवातीच्या काळात याच हॉर्नच्या मदतीने ट्रक चालक आणि वाहतूक व्यवस्थेमधील व्यक्तींनी अनेक संभाव्य अपघात टाळलेत हे विसरुन चालणार नाही.   

8/8

hornokplease

आज साईड मिरर आले, इंधनाची कमतरता नाही तरीही जवळपास सर्वच ट्रकचालक आपल्या गाडीवर मागील बाजूस 'Horn OK Please' हे वाक्य आवर्जून लिहून घेतात. हे वाक्य लिहून घेणं ही भारतीय ट्रक चालकांमध्ये जणू काही परंपराच झाली आहे.