`पवारांनी मुश्रीफांवर अल्पसंख्यांक म्हणून केलेला अन्याय बघा`; आव्हाडांनी शेअर केली `ती` यादी
Jitendra Awhad Shared List: कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समरजीत घाटगेंमध्ये थेट लढत होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच यापूर्वीच अल्पसंख्यांक असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Jitendra Awhad Shared List: भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा दिलेल्या समरजीत घाटगेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे यंदा कागल मतदारसंघामध्ये समरजीत घाटगे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ अशी थेट लढत होणार असल्याची दाट शक्यता आहे. असं असतानाच समरजीत घाटगेंच्या पक्षप्रवेशादरम्यान भाषण करताना शरद पवारांनी त्यांना जिंकून देण्याबरोबरच थेट मंत्रीपद देण्यासंदर्भातही भाष्य केलं. शरद पवारांच्या या विधानानंतर अजित पवारांच्या पक्षाचे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्यांकामागे का लागले आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. आता याच विधानानंतर शरद पवारांचे समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स हँण्डलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
समरजीत घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षाच प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी आपणच समरजीत यांच्याविरुद्ध जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. "गेल्या वेळेला ते (समरजीत घाटगे) निवडणुकीला उभे होते. ते फार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते. या वेळेसही ते मोठ्या मताधिक्याने पराभूत होतील. यावेळेस राजा विरुद्ध प्रजा अशी लढाई असून प्रजेचा विजय होईल. पवारसाहेब ज्या ज्या वेळेला कागलला आहेत त्यांनी राज्याच्याविरोधात प्रचार केला आहे. प्रजेला मतदान करायला सांगितलं आहे. कालच्या त्यांच्या भाषणाचा रोख तसाच होता ते प्रजेला विजयी करण्यासाठी आले होते," असं हसन मुश्रीफ म्हणाले.
अल्पसंख्यांक असल्याचा उल्लेख
"आपल्याला समोरच्या व्यक्ती कार्यक्रम करायचा आहे असं समरजीत घाडगे म्हणाले. शरद पवार स्वत: दोन वेळा तुमच्या मतदारसंघात जात आहेत. पक्षाची संपूर्ण ताकद समरजीत घाडगेंच्या मागे आहे. मुद्दाम हे केलं जातंय? पवार अल्पसंख्यांकांच्या मागे लागलेत, तुम्ही असं म्हणालात," असं म्हणत हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील दोघेही आपल्याविरुद्ध ताकद लावत असल्याचं म्हटलं. "मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे. असं असताना जयंत पाटील येऊन गेले. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्याच्या मागे का जोर लावत आहेत हे दोघे? याचं मला आश्चर्य वाटतं," असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
आव्हाड म्हणतात, हा अन्याय बघाच
हसन मुश्रीफ यांनी अल्पसंख्यांक असल्याचा उल्लेख केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हसन मुश्रीफ यांचा फोटो दिसत असून बाजूला मजकूर लिहिलेला आहे. "पवारसाहेबांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अल्पसंख्यांक म्हणून केलेला अन्याय बघा," असं म्हणत एक यादीच शेअर केली आहे. या यादीमध्ये हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी शरद पवारांनी कोणकोणती पदं आणि जबाबदाऱ्या दिलेल्या याचा उल्लेख आहे. या यादीत, "पाच वेळा आमदारकी, चार वेळा मंत्रीपद, वफ्फ बोर्ड, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निर्णयाचे अधिकार, जिल्हा बँकेतील सत्ता, महानगरपालिकेतील सत्ता, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाने" यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे.
घाटगेंचीही टीका
शरद पवार अल्पसंख्यांकाच्या मागे का लागलेत असं विचारणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्यावर समरजीत घाटगेंनीही टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांनी सहावेळा अल्पसंख्यांक असल्याचा उल्लेख केला यावरुन ते घाबरल्याचं दिसत आहे, असं समरजीत घाटगेंनी म्हटलं आहे.