Jitendra Awhad On Namo Rozgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन (Namo Rozgar Melava) करण्यात आलं आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला हजेरी लावतील. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भाजपचा हा मास्टरस्ट्रोक समजला जातोय. अशातच आता याच  नमो रोजगार मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


बारामतीमधील नमो रोजगार मेळावा म्हणजे सामान्य बेरोजगार तरूणांची दिशाभूलच सरकारने केल्याचे स्पष्ट होत आहे.  बारामतीला झालेला या मेळाव्यात किती लोकांना, किती पगाराच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या हे सरकार ने जाहीर केलेले नाही. 
या मेळाव्यात  एकूण 400 कंपन्यांपैकी फक्त 18 कंपनी पुणे जिल्ह्य़ाबाहेरील होत्या.  त्यामध्ये, सोलापूरमधील एक,  सांगलीतील एक आणि  मुंबईच्या एका कंपनीचा समावेश आहे. जर, पुणे जिल्ह्यात खरोखर एवढे रोजगार आणि रोजगारनिमित्त लोक वास्तव्यास येणार असतील तर पुणे शहराला एवढ्या लोकसंख्येचा भार उचलता येणार आहे का? मर्यादित संसाधने असताना या लोकसंख्येला कसे सामावून घेतले जाणार आहे ? याचे उत्तर सरकारकडे नाही, अशी टीका आव्हाडांनी केलीये.


सर्वात महत्वाचे म्हणजे, 45 हजार नोकऱ्या दिल्या जाणार असल्या तरी त्यापैकी 36 हजार नोकऱ्या या ट्रेनी स्वरूपाच्या आहेत. गमतीचा भाग म्हणजे, बँका आणि एनबीएफसीमध्ये 
ट्रेनी भरती करताच येत नाही. महिलांना देण्यात येणाऱ्या रोजगारात 22% घट झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे; पण,  कोणत्याही कंपनीने एकूण नोकऱ्यांपैकी किती जागा महिलां साठी, किती पुरुषांसाठी असा उल्लेख केलेला नाही. या मेळाव्यात दिली जाणारी नोकरी किती दिवसांसाठी असेल, पगार किती असेल आणि केव्हापासून वेतन सुरू होईल,  याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.


या मेळाव्यात 400 कंपन्या सहभागी झाल्याची आवई उठवण्यात आली असली तरी  फक्त 9 कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर या मेळाव्याची जाहिरात केली आहे. त्यामुळे उर्वरित 391 कंपन्या खरोखर सहभागी झाल्या होत्या की त्यांनी फक्त दिखावा केला, याबाबत स्पष्टता येत नाही. अनेक कंपन्या GST रजिस्टर्ड नाहीत. त्यांची कर्मचारी संख्या आताच 10 ते 15 जणांची आहे.... आता ते 100 कामगार घेऊन स्वतःचे नुकसान का करून घेतील? असा साधा प्रश्न पडत असून त्याचे उत्तर देण्यास एकही सरकारी प्रतिनिधी तयार नाही, असा आरोप आव्हाडांनी केलाय.


वय वर्ष 24 ते 30 च्या लोकांच्या नोकऱ्यांमधे 28% घट झाली आहे पण त्यांच्यासाठी असलेल्या नोकऱ्यांची संख्या फक्त 2000 च्या आसपास आहे. इथेच हा रोजगार मेळावा केवळ धूळफेक असल्याचेच स्पष्ट होत आहे. एकीकडे खासगी आस्थापनांमध्ये भरतीसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असतानाच सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष भरण्याबाबत सरकारमधील एकही मंत्री बोलत का नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे.


दरम्यान, एकूणच हा मेळावा म्हणजे बेरोजगार युवकांची फक्त फसवणूक नाही तर त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्टंटबाजी करून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांची मती गुंग करण्याचा प्रयत्न असला तरी आता जनता शहाणी झाली आहे. दोन कोटी रोजगार, बस हुई महँगाई की मार... 15 लाख  या सर्व भूलथापांना जनता भिक घालणार नाही, असंही आव्हाड म्हणाले आहेत.