पुणे तिथे काय उणे? नोकरी उणे; पुणेकरांनाही कोरोनाचा फटका
कोरोनाचा फटका पुणेकरांनाही बसला आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
पुणे : कोरोनामुळे सगळंच अर्थकारण बिघडून गेले आहे. त्याला पुणे देखील अपवाद नाही. कोरोनाचा फटका पुणेकरांनाही बसला आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांचं उत्पन्न घटलं, अशा बाबी एका सर्वेक्षणात पुढं आल्या आहेत.
22 टक्के पुणेकरांनी गमावली नोकरी
51 टक्के पुणेकरांच्या उत्पन्नात घट
पुण्यातील नोकरदारांना कोरोनाचा जबर आर्थिक फटका बसल्याचे चित्र आता समोर आले आहे. पुण्यातील 40 तरुणांनी एकत्र येऊन एक कोरोनाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.
ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून या तरुणांनी पुणेकरांवर झालेल्या कोरोनाच्या परिणामांचा अभ्यास केला.
त्यात पुण्यातील जवळपास 22 टक्के नागरिकांना नोकरी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना काळात तब्बल 51 टक्के नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली.
निम्म्याहून अधिक नागरिकांना कोरोनाची भीती वाटते, अशी माहिती या सर्वेक्षणातून पुढं आली आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 2245 जणांपैकी 69 टक्के नागरिक 18 ते 45 या वयोगटातील होते.
सर्वेक्षणात पुणेकरांमधील कोरोनाबद्दलची जागरूकता, सवयी आणि आरोग्य विषयक परिणामही अभ्यासण्यात आले. सामुदायिक शहाणपण या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करून परिस्थितीबद्दलचे अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
सर्वेक्षणात समोर आलेली माहिती धक्कादायक तर आहेच, पण विचारमंथन करायला लावणारी आहे.. हे सगळे कोरोनाच्या पहिल्या लाटेचे परिणाम आहेत. आता दुसरी लाटही आलीय.. त्यामुळं सगळ्यांनीच अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे.