पुणे : पुण्यातील बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी बालात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली आहे. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ज्योतीकुमारी विप्रो बीपीओमध्ये कामाला होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी संध्याकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना तिचा कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर गहुंजे परिसरात बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.


उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. २ महिन्यांपूर्वी त्यांच्या दया याचिका राष्ट्रपतींकडे आल्या होत्या. त्या फेटाळण्यात आल्यानं आता या आरोपींची फाशी अटळ आहे. संपूर्ण देशात खळबळ उडवून दिलेल्या या घटनेनं आयटी क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड होणार असल्यानं दूर्दैवी ज्योतीकुमारी आणि तिच्या कुटुंबियाना न्याय मिळणार आहे.