कबड्डी खेळताना एका खेळाडूचा दुर्देवी मृत्यू
शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथं शनिवारी संध्याकाळी कब्बडी खेळताना एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथं शनिवारी संध्याकाळी कब्बडी खेळताना एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. गौरव वेताळ असं या खेळाडूचे नावं.. गौरवच्या अकस्मात मृत्युनं उष्माघात आणि खेळाडूंमधला तणाव हे मुद्दे चर्चेत आलेत. गौरव उत्तम कबड्डी खेळाडू होता. पण शनिवारी शाळेच्या मैदानावर रंगलेला कबड्डीचा सामना त्याच्यासाठी शेवटचाच ठरला. गौरव वेताळ हा शिरूर तालुक्यातल्या न्हावरे गावचा. पिंपळे जगतापमधल्या जवाहर नवोदीत विद्यालयात तो शिक्षण घेत होता. याच शाळेत शनिवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमाराला कब़ड्डीचा सामना ऐन रंगात आला होता. त्याचवेळी गौरवला चक्कर आली, आणि तो कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
चक्कर आल्यानंतर रुग्णालयात दाखल
गौरवला चक्कर आल्यानंतर शिक्षकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.... शिक्षकांनी रुग्णालयात न्यायला उशीर केला असा गौरवच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
कबड्डी खेळाडू गमावल्याची स्थानिकांची भावना
गौरवच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होते आहे. महाराष्ट्रानं भविष्यातला उत्तम कबड्डी खेळाडू गमावल्याची स्थानिकांची भावना आहे. पण गौरवच्या मृत्यूच्या निमित्तानं उन्हाळा, ताणतणाव, कमी वयातले आजार असे सगळे मुद्दे पुन्हा चव्हाट्यावर आलेत.