काजल भोरची गरिबीवर मात, देशपातळीवर आजमावणार नशीब
खो-खो खेळात सुवर्णपदक मिळवून देणारी काजल भोर
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील काजल भोर या मुलीने खो-खो खेळात जबरदस्त कामगिरी करत देशाला सुवर्णपदक मिळुन दिले. गाव पातळीवरुन सुरु झालेला तिचा हा मैदानी खेळाचा प्रवास आता देशपातळीवर नशीब आजमावत आहे. काजलचा प्रवास खो-खो या मैदानी खेळातून नव्या उमेदीच्या जोमात सुरु झाला. या प्रवासात काजलने गावपातळीपासून देशपातळीपर्यंत खो-खोच्या मैदानी खेळातून अनेक मैदाने गाजवली.
खो-खो हा खेळ सांघिक असला तरी हा खेळ आणि खेळाडूची चपळता आणि मैदानावर तग धरण्याच्या क्षमतेची कसोटी लागते. या दोन्ही पातळ्यांवर काजलने अव्वल स्थान मिळवले यातुनच एक यशस्वी किरण उद्यास आलं आणि सुरु झाला तिचा प्रवास.
याच खो-खो खेळातील सुवर्णकन्या म्हणुन एक वेगळी ओळख काजलने निर्माण केली. काजलचा जन्म राजणी गावातील भोर कुटुंबात अगदी गरीब परिस्थितीत झाला. सात बहिणी आई-वडिल असा परिवार आहे. तिची आई अपंग तर वडील शेतात काबाडकष्ट करतात.
आपल्या परिस्थितीवर मात करण्याची जिद्द काजलने मनाशी ठाम केली होती. तिची जिद्द आणि चिकाटी ही तिला खो-खोच्या मैदानी खेळात यशस्वी शिखरावर घेऊन गेली. आई-वडिलांनी मुलगा नाही म्हणून मुलींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उलट मुलींनाच प्रोत्साहन दिले आणि आज याच मुलीने आमचं नाव उज्वल केलं.
मुलगा नाही म्हणून नाराज न होता मुलगी ही प्रगती करू शकते. त्यामुळे मुलीला कधीच "नकोशी" करू नका ही सांगायला काजलचे वडील विसरले नाही. रांजणी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत विद्यालयीन शिक्षण घेत असताना शाळेतील क्रीडाशिक्षकांनी खो खो खेळात काजल व तिच्या मैत्रिणींचे भविष्य घडवलं.
याच परिश्रमाच्या जोरावर काजल भोर या विद्यार्थिनीनं देशाच्या संघाचे कप्तान पद हातात घेतले. राष्ट्रीय स्तरावर दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून चमकदार कामगिरी केल्याने काजल सुवर्णकन्या बनली. त्यामुळे तिला १४ सुवर्णपदक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तिच्या यशाचं कौतुक शाळेसह संपूर्ण परिसराला झालं.
आजच्या युगात मुलगी व तिच्या कर्तुत्वाकडे आजही वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे तिला तिचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही मात्र काजलला तिच्या कुटुंबातून शाळेतून मिळालेले प्रोत्साहन आणि त्यातून तिने घेतलेली मेहनत आज तिला सुवर्णकन्या म्हणून यशस्वी किरणावर घेऊन गेले. त्यामुळे काजलच्या यशाचं कौतुक देशभरात केले जात आहे.