मुंबई : भाजपाच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा लेखी स्वरूपात सादर केला. नायगावचे आमदार कालीदास कोळंबकर हे काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर होते. पण आज यावर शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत घोषणा केली होती, तर त्यांच्या संपर्क कार्यालयावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले होते. शिवसेना सोडून 2005 साली कोळंबकरांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसला रामराम करून कोळंबकर भाजपात जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकरांच्या बॅनरवरून कॉंग्रेसचे चिन्ह गायब झाल्याचे दिसत होते. त्यानंतर हल्लीच त्यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेरील फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसला. यातून कोळंबकरांनी आपल्या भाजपा प्रवेशाची चाहुल दिली. कोळंबकरांसाठी सध्या वडाळा नायगाव परीसरातील पोलीस वसाहतीच्या पुनरवसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुख्यमंञ्यांनी माझी सर्व कामे केली तसेच आमच्या मागण्या पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.



काँग्रेस पक्षात एकही काम झाले नाही, प्रश्न सुटले नाहीत म्हणून मी नाराज असल्याचे कोळंबकरांनी यावेळी सांगितले. माझ्या अडलेल्या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्यावर माझा प्रवेश असेल असे सूचक विधान त्यांनी 'झी 24' शी बोलताना केले. मुंबई पोलिसांच्या गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भातील प्रश्न सुटल्यावर मी जाहीर प्रवेश करणार असल्याचे विधान आमदार कोळंबकर यांनी केले आहे. त्यामुऴे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.