आतिश भोईर, मुंबई : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या वालधुनी येथील स्व.आनंद दिघे पुलाचे लोकार्पण करण्याचे श्रेय लाटण्याची आज सकाळी जणू शर्यत रंगल्याचे दिसून आले. तासाभराच्या कालावधीत शिवसेना आणि भाजप दोघाकडूनही या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेने हे काम शिवसेना नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्याचे म्हटले. तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामासाठी आपण निधी आणला होता. सरकार आलं म्हणजे कुठेही नारळ फोडायचा नसतो सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात श्रेयवाद चांगलाच उफाळून आला आहे. गेल्या महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला वालधुनी येथील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. या पुलाच्या कामाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. सकाळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 4 कोटी 35 लाखाच्या आमदार निधीतून आपणच हे काम केल्याचा दावा करत पुलाचे लोकार्पण करण्यासाठी सकाळी 11 चा मुहूर्त निवडला होता. मात्र शिवसेनेने त्याआधीच सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  शिवसेना नगरसेवक धनंजय बोराडे यांच्यासह शिवसैनिकांनी घाईगडबडीत या पुलाचे लोकपर्ण करत पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार नागरिकांची त्रासातून सुटका करण्यासाठी लोकपर्ण केल्याचा दावा केला. 


पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी प्राप्त झाल्याचे सांगत पुलाचे लोकार्पण केले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते पुन्हा पुलाचे लोकपर्ण करण्यात आले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली. सत्ताधारी शिवसेनेला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विकास कामांसाठी दिलेले 500 कोटींचा निधी नीट वापरता आला नाही. तर 6 हजार 500 कोटींचा निधी कसा वापरला असता असा सवाल गायकवाड केला. ज्या नगरसेवकाने याठिकाणी उद्घाटन केले त्या वॉर्डात साधे गटार पायवाटाही ते बनवू शकले नसून त्यासाठी आपण आमदार निधी दिला. या रस्त्याच्या कामासाठीही आपणच निधी आणला होता, ज्याचं श्रेय त्याला घेवू द्या, सरकार आलं म्हणजे कुठेही नारळ फोडायचा नसतो.' असे सांगत शिवसेनेला लक्ष केले.