विवाहबाह्य संबंधात अडसर, बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने पतीचा खून केला, संशय येऊ नये म्हणून...
Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत निर्घृणपणे पत्नीने हत्येचा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण आडीवली भागात घडला आहे. पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून देण्यात आला होता. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या सगळ्या गुन्ह्याचा शीताफिने तपास करत आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
चंद्रप्रकाश लोवंशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रप्रकाश याची पत्नी रीता लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांनी चंद्रप्रकाश याच्या हत्येचा कट ४ महिन्यांपूर्वी रचला होता. कोणाचाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रिताने काही दिवसांपूर्वीच चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. या घटनेला काहीच दिवस उलटत नाहीत तोच कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळं या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विहिरीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच, मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासानंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीत ढकलण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसंच, मृतदेहाच्या गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीची हत्या करून त्याला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केलं.
पोलिसांना तपासात हा चंद्रप्रकाश लोवंशी असून तो डोंबिवली दावडी परिसरात राहणारा असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची पत्नी रिता हिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवतच तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले. पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याचे चंद्रप्रकाशची हत्या करण्यात आल्याची कबुली यावेळी दोघांनी दिली. यात आरोपी सुमित विश्वकर्मा याने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांची मदत घेतली. त्यांच्या कारमध्ये बसवून चंद्रप्रकाश याला एका निर्जन स्थळी नेले. नंतर चंद्रप्रकाशचा गळा चिरून पाठीवर व गुडघ्यावर निर्घृण वार करुन त्याची हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह अडवली परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून देण्यात आला.