आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणमधल्या (Kalyan) एका हिंदी शाळेतील (School) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षकाने एका विद्यार्थ्याला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. हा विद्यार्थी हिंदी हायस्कूलमधल्या मोठ्या शिशूत शिकतो. शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शिक्षक अशोक तिवारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Student beaten by teacher)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित मुलगा आई वडिलांसह कल्याण पश्चिम परिसरातील चिकणघर परिसरात राहतो. 30 जानेवारीला हा विद्यार्थी वर्गातील एका मुलाबरोबर मस्ती करत होता. त्यामुळे संतापलेले शिक्षक अशोक तिवारी यांनी या पाच वर्षाच्या मुलाला हाताने आणि छडीने बेदम मारहाण केली .तिवारी यांनी मुलाला इतके मारले की मुलाच्या तोंडावर, हातावर, पायावर मारहाणीचे व्रण उठले होते. मुलगा घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी त्याच्या अंगावरचे व्रण पाहिले. त्यांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात नेलं. त्यानंतर पालकांनी शिक्षक अशोक तिवारी यांच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवणारा शिक्षक अटकेत
दरम्यान, कोल्हापूरमध्ये नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी इथला नराधम शिक्षक व्ही.पी बांगडी याला अखेर पोलिसांनी (Kolhapur Police) तीन महिन्यांनी अटक केली आहे. शाळेतील मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवत विनयभंग केल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे करण्यात आली होती. मुख्याध्यापकांनी ही बाब संस्थेच्या निदर्शनास आणून दिली. पण संस्थेने या शिक्षकावर कारवाई न करता केवळ बदली केली.


कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी शाळेतील हा धक्कादायक प्रकार असून शाळेतील एक शिक्षक नववी आणि दहावीतल्या विद्यार्थ्यांना चक्क वर्गात अश्लील व्हिडिओ (Porn Video) दाखवायचा. विद्यार्थिनींच्या खांद्यावर हात टाक,  याप्रकाराची तक्रार विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली.


स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधीत शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शिक्षकाची हिम्मत आणखी वाढली आणि त्याने तक्रारदार विद्यार्थिनींच्या पालकांना फोन करुन तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. सातारा जिल्ह्यातील ज्या शाळेत या शिक्षकाची बदली झाली आहे, त्या शाळेतील विद्यार्थिनींसोबतही असेच प्रकार होऊ शकतात, यासाठी त्या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित विद्यार्थिनींनी केली. पालक आणि विद्यार्थ्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने अखेर नराधन शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या.