दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद
उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : दिवसाढवळ्या घरफोड्या करुन कल्याण ,टिटवाळा, शहापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण खडकपाडाप पोलिसांनी सापळा रचत अतिशय शिताफीने या तरुणाला अटक केली. झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी आणि डान्सबारचं व्यसन लागल्याने या तरुणाने चक्क चोरीचा मार्ग अवलंबिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
दागिने आणि रोख रक्कम जप्त
रोशन जाधव असं या उच्चशिक्षित चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 47 तोळे सोन्याचे दागिने ,मोबाईल, लॅपटॉप महागडी घड्याळं हस्तगत केली आहेत. एकूण आठ घरफोड्याची उकल पोलिसांनी तपासात केली आहे. कल्याण आणि आजूबाजूच्या शहरात दिवसाढवळ्या घरफोड्याचे प्रमाण वाढले होतं. दोन दिवसांपूर्वी कल्याणमधल्या मोहने परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करीत चोरट्याने ३५ तोळे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर पोलिसांच्या विषेश पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. यावेळी या सर्व घरफोड्यांच्या मागे असलेल्या एकच व्यक्ती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अखेर पोलिसांनी पाळत ठेवत मोठ्या शिताफिने रोशन जाधव या तरुणाला अटक केली. मोहने, अंबिवली, टिटवाळा ,शहापूर या शहरातील एकूण 8 गुन्हे त्याच्याकडून पोलिसांनी उघडकीस आणले.
यामध्ये तब्बल 47 तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप ,मोबाईल, महागडी घड्याळ, असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे रोशनने मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केलं आहे आणि तो एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात तो काम देखील करत होता. मात्र याच दरम्यान त्याला डान्स बारची सवय जडली. त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली. मग पैसे कमावण्यासाठी रोशनने घरफोड्या करण्याचा मार्ग शोधला. यासाठी तो आधी रेकी करायचा.
वॉचमन नसलेल्या आणि सीसीटीव्ही नसलेल्या इमातीमधली बंद घर तो शोधून ठेवायचा. त्यानंतर संधी साधत तो घर साफ करायचा. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता. पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.