Kalyan Crime Shooting: भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच अंदाधुंद गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाणे शहरातील ज्युपीटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर आपणच गोळीबार केल्याची कबुली देताना आमदार गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसाला आरोपी बनवत आहेत, असं आमदार गायकवाड यांनी 'झी 24 तास'कडे नोंदवलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. गणपत गायकवाड यांना सकाळी साडेसातच्या सुमारस पोलिसांनी अटक केली आहे. (गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)


थेट शिंदेंवर साधला निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. जमीनीच्या वादातून हा हल्ला झाला आहे. गणपत गायकवाड यांना या गोळीबारानंतर पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं. या घटनेनंतर 'झी 24 तास'शी बोलताना गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याची कबुली दिली. "पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली," असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


नक्की वाचा >> 'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी


मी त्यांना जिवे मारणार नव्हतो...


तुम्ही पोलिसांसमोर 5 गोळ्या झाडल्या असा आरोप आहे, असं म्हणत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, "हो मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?" असा प्रश्न उपस्थित केला. "पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत," असं आमदार गणपत गायकवाड म्हणाले. 



मी अनेकदा वरिष्ठांना सांगितलं पण...


"एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे," असंही गणपत गायकवाड म्हणाले. "मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे स्वत:चे बोर्ड लावतात जबरदस्तीने. मी वेळोवेळी सांगितलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी आपले बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे," असंही गणपत गायकवाड यांनी सांगितलं.