डोंबिवली : कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामूळे कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका एका गाडीला ४ ते ६ तास थांबावे लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठिकठिकाणी दिसणारे कचरे ढिग आणि त्यामुळे सुटलेली दुर्गंधी यामुळे सध्या कल्य़ाणकर पुरते हैराण झालेत. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी मोठाले ढिग साचले आहेत. त्यावरून नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी शिवसैनिकांसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी मोठा गदारोळ घातला होता. त्यावेळी शहरातील स्वच्छतेबाबत तातडीने बैठक घेऊन कार्यवाहीचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र डम्पिंग ग्राऊंडवरील सद्यस्थिती पाहता त्यात फारसा फरक पडला नसल्याचेच दिसत आहे.


गेल्या महिन्याभरापासून याठिकाणी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या गाड्यांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.  गाडी रिकामी करण्यासाठी 6 तासांपेक्षाही जास्त वेळ लागत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत. आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या या परिसरात कचऱ्याच्या गाड्यांमूळे अजून वाहतुकीला अडथळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दम्यान कल्याणातील कचऱ्याची समस्या ही प्रामुख्याने डम्पिंग ग्राऊंडमुळे निर्माण झाली असल्याचे महापौरांनी मान्य केले.


या मुद्द्यावरून नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. महासभेत प्रशासनाला डम्पिंग ग्राऊंडकडे जाणारा रस्त्याची डागडुजी करण्याचे निर्देशही देण्यात आले. पण गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं डागडुजीही लांबली. त्यामुळे कच-याचा हा त्रास पुढचे आणखी काही महिने कल्याणकरांची डोकेदुखी ठरणार आहे.