कल्याण : येथील डम्पिंग ग्राउंडची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. पर्यायी रस्ता तातडीने तयार करण्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर अभूतपूर्व, अशी कचरा कोंडी झाल्याने कचरा टाकण्यास जागाच उरली नसल्याची बातमी 'झी २४ तास'ने काही दिवसांपूर्वी दाखवली होती. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता.


कचरा उचलण्यास सुद्धा विलंब होत असल्याने महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आज भर पावसात डम्पिंग ग्राऊंड परिसराचा दौरा करत केडीएमसीअधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. डम्पिंग ग्राऊंडवर जागा नाही आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने अडचण येत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीच्या आत हा रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केले.


तोपर्यंत पर्यायी रस्ता म्हणून डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला असणाऱ्या ट्रक टर्मिनल येथून तयार करण्यात यावा आणि तेथून मागच्या बाजूस कचरा डम्प करावा, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.