किल्ले बनवण्यासाठी भर उन्हात आणायला लावली माती, विद्यार्थ्याचा मृत्यूने खळबळ
शिवजंयतीनिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना किल्ले बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. यासाठी त्यांना डोंगरावरुन माती आणण्यास सांगण्यात आलं होतं
आतिष भोईर, झी मीडिया : कल्याणमध्ये (Kalyan) सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या (Student) संशयास्पद मृत्यूने (suspicious death) खळबळ उडाली आहे. कल्याणमधल्या सूचक नाका परिसरातील एका शाळेत हा विद्यार्थी शिकत होता. मृत विद्यार्थ्याचं नाव आफताब सय्यद असं आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Kalyan Police) घटनास्थळी येऊन पाहणी केली असून याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
काय आहे नेमकी घटना?
कल्याणमधील सूचक नाका परिसरात असलेल्या एका शाळेत विद्यार्थ्यांना शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्ताने किल्ले बनवण्यास सांगण्यात आलं होतं. किल्ले बनवण्यासाठी माती लागणार होती. यासाठी शाळेने सातवी वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षांच्या आफताब सय्यद या विद्यार्थ्यासह आणखी दोन विद्यार्थ्यांना माती आणण्यासाठी भर उन्हात डोंगरावर पाठवल होतं.
सलग तीन दिवस आफताब आणि इतर दोन विद्यार्थ्यांना डोंगरावरुन माती आणण्याचं काम देण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी मातीचं ओझं आणि तापत्या उन्हामुळे आफताबला त्रास होऊ लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. आफताबच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आफताबचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. शाळेने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर का पाठवलं असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. याप्रकरणी शाळेने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मुलांना फावडे, कुदळ घेऊन विद्यार्थ्यांना माती आणण्यासाठी पाठवलं जात होतं, शाळेच्या आवारात जवळपास आठ किल्ले बनवण्यात आले. घटनेच्या दिवशीही आफताबने डोंगरावरुन माती आणली होती. त्यानंतर तो शाळेतून घरी गेला. घरी गेल्यावर तो जेवलाही, पण त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
आफताबच्या मृत्यूने पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आफताबच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.