पत्रीपुलाचं गर्डर लाँचिंग यशस्वी, मध्यरात्री विशेष ब्लॉक घेत काम पूर्ण
कल्याणच्या पत्रीपुलाचा अतिशय किचकट पण तितकाच महत्त्वाचा गर्डर लाँचिंगचा टप्पा काल मध्यरात्री पूर्ण करण्यात आला.
आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणच्या (Kalyan) पत्रीपुलाचा (Patripool) अतिशय किचकट पण तितकाच महत्त्वाचा गर्डर लाँचिंगचा टप्पा काल मध्यरात्री पूर्ण करण्यात आला. कामगारांपासून खासदारांपर्यंत सर्वच स्तरावर प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. काल रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमध्ये केवळ ९० टक्के काम झालं होतं. मात्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी रेल्वेकडून पुन्हा मध्यरात्री दीड ते तीनच्या दरम्यान ब्लॉक मिळवत हे उरलेलं १० टक्के कामही पूर्ण केलं गेलं.
ब्लॉक संपल्यावरही पहाटे सहा वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू असताना वरती गर्डर सरकवण्याचं काम सुरूच होतं. प्रयत्नांची शर्थ करत हा अवाढव्य गर्डर पहाटे सहा वाजून ५ वाजेपर्यंत बसवण्यात आला. काम पूर्ण झाल्यावर खासदारांसह सर्व अभियंते, पोलीस, कर्मचारी सर्वांनी एकच जल्लोष केलं.
कल्याणच्या पत्रीपुलाचं गर्डर लाँचिंगचं काम पूर्ण करण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमाराला रेल्वेवर विशेष ब्लॉक घेऊन पत्रीपुलाच्या उर्वरीत लाँचिंगचं १० टक्के कामही पूर्ण करण्यात आलं. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
कल्याणच्या पत्रीपुलाचा अतिशय किचकट पण तितकाच महत्त्वाचा गर्डर लाँचिंगचा टप्पा काल मध्यरात्री पूर्ण करण्यात आला.
काम पूर्ण होईपर्यंत खासदार श्रीकांत शिंदे तिथे उपस्थित होते. ७६ मीटर गर्डर लाँचिंगसाठी २१ आणि २२ नोव्हेंबरला विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी म्हणजे २२ तारखेला गर्डर ४० मीटर ढकलण्यात आला. २२ तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे ९० टक्के कामच पूर्ण होऊ शकलं.
उर्वरीत १० टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्याशी चर्चा करत लवकरात लवकर ब्लॉक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेल्वेनेही सकारात्मक प्रतिसाद देत मध्यरात्री १.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत ब्लॉक मंजूर केला.
विशेष ब्लॉकची वेळ संपेपर्यंत हा गर्डर सुरक्षित अंतरावर पोहोचवण्यात यश आल्याने ब्लॉक संपल्यावरही गर्डर ढकलण्याचं काम सुरूच होतं. खालून लोकल, एक्स्प्रेस येत जात असताना हा महाकाय गर्डर हलवला जात होता. पहाटे सहा वाजेपर्यंत हे काम सुरू होतं. अखेरचा तीन मीटरचा भाग नियोजित जागेवर पोहोचणे अपेक्षित असतानाच एक तांत्रिक बिघाड झाला. मात्र तातडीने हा बिघाड दुरूस्त करण्यात आला. अखेर ६ वाजून ५ मिनिटांनी गर्डर लाँचिंग यशस्वी झालं आणि मोठा जल्लोष करण्यात आला.