कल्याण स्थानक स्वच्छतेच्या परीक्षेत नापास
कल्याण स्थानकावर अस्वच्छतेचं साम्राज्य
चंद्रशेखर भुयार, कल्याण : मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाचा स्वच्छतेचा दर्जा दिवसेन दिवस खालावत चालला आहे. देशभरात घेण्यात आलेल्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या आढाव्यात स्वच्छतेच्या दृष्टीने कल्याण स्थानक सर्वांत तळाशी असल्याचे समोर आलं आहे.
११ स्थानांनी घसरण
मध्य रेल्वेचं कल्याण रेल्वे स्थानक म्हणजे अत्यंत महत्त्वाचं स्थानक. कर्जत आणि कसारा या दोन्ही मार्गांचं हे मध्यवर्ती ठिकाण. लाखो प्रवासी या स्थानकावरुन रोज प्रवास करतात. मात्र 'क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया'नं केलेल्या देशातल्या ४०७ रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण रेल्वेस्थानक ७४ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कल्याण स्थानक ६३ व्या स्थानावर होतं. त्यानंतर स्वच्छतेचा गाजावाजा करण्यात आला. मात्र तरीही सुधारणा होण्याऐवजी या स्थानकाची ११ स्थानांनी घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव
सध्या या स्थानकात मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत. रेल्वे फलाटावर ठीक-ठिकाणी कचरा पाहायला मिळतोय. फलाटावर अजूनही सांडपाणी वाहतं आहे. प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय आणि इच्छा शक्तीचा अभाव आहे. हे स्थानक स्वच्छतेच्या परीक्षेत नापास झालं आहे.