Pune Car Accident Kalyani Nagar: पुणे शहरात शनिवारी घडलेल्या अपघात प्रकरणात 17 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर झाला आहे. कल्याणीनगर परिसरात शनिवारी हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगाच ही अलिशान कार चालवत असल्याचे समोर आले होते. अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र, अवघ्या 15 तासांतच आरोपीला जामीन मंजुर झाला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने कोर्टाकडून जामीन मंजूर झाला झाला असून या प्रकरणी आता आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे त्याला जामीन मंजुर करण्यात आला आहे. जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने काही अटी शर्थीदेखील ठेवल्या आहेत. कोर्टाने आरोपीला या दुर्घटनेवर निबंध लिहिण्यास सांगितले आहे. तसंच, 15 दिवस येरवडा ट्रॅफिक पोलिसांत स्वेच्छेने काम करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाला दारू सोडण्यासाठी मदत करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेण्यास सांगितले आहे. 


पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेप्रकरणी अल्पवयीन आरोपी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. आता आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणार  आहे. त्याशिवाय, आरोपीने ज्याठिकाणी मद्यप्राशन केले त्या बार मालकावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 


कशी घडली दुर्घटना?


पुणे अपघात दुर्घटना जवळपास मध्यरात्री सव्वा तीनच्या आसपास घडली आहे. कल्याणीनगरमधील एका पबमधून हे तरुण तरुणी आणि त्यांचे काही मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले होते. जेव्हा ते कल्याण नगर जंक्शनला पोहोचले तेव्हा एका भरधाव पोर्शे कारने मोटारसायकलवरील दोघा तरुण-तरुणीला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांना धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या किनारी असलेल्या फुटपाथच्या रेलिंगला टक्कर दिली. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओत नागरिक कार चालकाला बाहेर काढून त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 


कार अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावं अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया अशी आहेत. येरवडा पोलिस  ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.