कल्याणचा पत्रीपूल २४ ऑगस्टपासून पाडायला सुरुवात होणार
ब्रिटीशकालीन पूल पूर्णपणे बंद
कल्याण : कल्याणचा पत्रीपूल २४ ऑगस्टपासून पाडायला सुरुवात होणार आहे. उद्यापासून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे. पुढच्या दोन दिवसात पुलावरील युटिलिटी सर्व्हिसेस (इलेक्ट्रिक लाईन, केबल-इंटरनेट केबल्स) काढणार असून त्यानंतर २४ तारखेपासून रेल्वेकडून पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे. एमएसआरडीसी कडून पुढच्या तीन महिन्यात पूल नव्याने उभारला जाणार आहे. केडीएमसी मुख्यालयात पार पडलेल्या सर्व विभागांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला केडीएमसी, रेल्वे, वाहतूक विभाग, एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे. सूचक नाका येथून दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पुलावरून होईल. हा ब्रिटीश कालीन पूल आहे.
अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर सगळ्या जुन्हा पुलांचं ऑडिट करण्यात आलं. ज्यामध्ये कल्याणचा पत्री पूल हा धोकादायक असल्याचं समोर आलं. 100 वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या या पुलाचा काळ देखील संपला आहे.