मुंबई :  मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला स्वराज्याचे आरमार प्रमुख "सरखेल कान्होजी आंग्रें" यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली. सोशल मीडियात हे पत्र फिरत असून संभाजी राजे यांच्या मागणीला दुजोरा दिला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणच्या भूमीत जन्मलेले महाराष्ट्राचे सुपूत्र आणि स्वराज्याचे नौदलप्रमुक कान्होजी आंग्रे यांचे नावे मुंबई-गोवा महामार्गास द्यावे असे पत्र संभाजी राजेंनी पाठवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दुरदृष्टी समोर ठेवून कान्होजी आंग्रे यांनी आरमाराची स्थापना केली होती. 



महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्यावर चाल केली. यावेळी अगणित मावळ्यांनी आपले योगदान दिले. यामध्ये स्वराज्याच्या सागणी सीमांचे रक्षण कान्होजी आंग्रे यांनी केले होते. त्यांचा हा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केल्याची आठवण संभाजी राजे यांनी पत्रातून केली. 


कान्होजी आंग्रे यांनी औरंगजेबाच्या काळातच नव्हे तर पुढे जाऊन १७२९ पर्यंत इंग्रज, पोर्तुगिज आणि सिद्धी या शत्रुंवर दहशत ठेवली. याचे शेकडो पुरावे इंग्रज आणि पोर्तुगिजांच्या दफ्तरात मिळतात. कोकणच्याच नव्हे तर महाराष्ट्र आणि अखंड हिदुस्थानाच्या इतिहासाची पुर्तता कान्होजी आंग्रे यांच्याशिवाय होऊ शकत नाही, असे संभाजी राजे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.